Skip to main content
Install App
If you're using:

पाच वर्षांपर्यंतच्या मुलांमध्ये ऑटिझमची सुरुवातीची लक्षणे

Default Avatar
Dr Ajay Sharma
Also available in: हिंदी English
Like Icon 0Likes
Download Icon 0 Downloads

Key Takeaways:

  1. ऑटिझम किंवा ऑटिझम स्पेक्ट्रम डिसऑर्डर (ASD) ही मेंदूच्या विकासाशी संबंधित स्थिती आहे, जी बोलणे, सामाजिक संवाद आणि संवेदनांच्या प्रक्रियेला प्रभावित करते.
  2. ऑटिझमची लवकर लक्षात येणारी लक्षणे म्हणजे बोलण्यात किंवा संवादात फरक, इतरांशी वागणं, आवाज किंवा स्पर्शासारख्या गोष्टींवर प्रतिक्रिया, आणि रोजची ठरलेली सवय ठेवण्याची आवड.
  3. काही मुले हात हलवणे (hand-flapping), झुलणे (rocking) अशा प्रकारच्या हालचाली करतात, ज्यामुळे त्यांना स्वतःला शांत वाटते. याला स्टिमिंग म्हणतात.
  4. लवकरच ही लक्षणे ओळखल्यास, पालकांना त्यांच्या मुलासाठी योग्य उपचार शिक्षणपद्धती मिळवता येतात.
  5. लवकर मिळालेली मदत मुलांच्या ताकदीवर भर देते आणि त्यांना वाढण्यासाठी योग्य वातावरण तयार करतं.
  6. पालक आणि काळजीवाहक यांची भूमिका खूप महत्त्वाची असते. जर तुम्हाला तुमच्या मुलामध्ये ऑटिझमची काही लक्षणं वाटत असतील, तर तुमच्या अंतःप्रेरणेवर विश्वास ठेवा आणि बालविकास तज्ज्ञांशी बोलावं. लवकर मदत घेणं हे कोणतंही लेबल लावणं नाही, तर एक सकारात्मक पाऊल असतं.
Infographic Image

ऑटिझम स्पेक्ट्रम डिसऑर्डर (ASD) म्हणजे काय?

ऑटिझम स्पेक्ट्रम डिसऑर्डर (ASD) ही एक मेंदूच्या विकासाशी संबंधित स्थिती आहे, जी मुलांच्या संवाद, सामाजिक वागणूक आणि वर्तणुकीवर परिणाम करते. ऑटिझमची लवकर लक्षणं ओळखणं खूप महत्त्वाचं आहे, कारण लवकरच उपचार सुरू केल्यास मुलांच्या प्रगतीमध्ये मोठा फरक पडू शकतो.

ऑटिझम स्पेक्ट्रम डिसऑर्डर समजून घेणे

ASD मध्ये मुख्यत्वे दोन गोष्टी दिसून येतात: सामाजिक संवाद आणि इतरांशी नाते ठेवण्यात अडचण . मर्यादित आणि पुन्हा-पुन्हा होणाऱ्या वागणुकीच्या सवयी. ऑटिझम “स्पेक्ट्रम” स्वरूपात असतो, म्हणजे प्रत्येक मुलामध्ये याची लक्षणं वेगवेगळी असू शकतात  कुणामध्ये ती सौम्य असतात, तर कुणामध्ये ती अधिक तीव्र असतात. ऑटिझम कशामुळे होतो हे पूर्णपणे समजलेलं नाही, पण संशोधनानुसार, आनुवंशिक (genetic) आणि पर्यावरणीय (environmental) घटक यांचा एकत्रित परिणाम असतो.

ऑटिझम किती सामान्य आहे?

2025-मध्ये अमेरिकामध्ये दर 31 पैकी 1 मुलाला (3.2%) ASD असल्याचे अंदाज आहे. भारतात, दर 68 पैकी 1 मुलामध्ये, म्हणजे 100 मुलांमधून सुमारे 1.12 मुलांमध्ये, ASD आढळून येतो (वय: 2 ते 9 वर्षे).

मुलांमधील ऑटिझमची सुरुवातीची लक्षणं

प्रत्येक मुलाचा विकास वेगवेगळा असतो. काही मुलांमध्ये अशा प्रकारचे बदल दिसतात जे ऑटिझमची लक्षणं असू शकतात. ही लक्षणं “दुरुस्त करायची समस्या” नसून, समजून घेऊन आधार देण्यासारखी फरक आहेत. ही लक्षणं लवकर ओळखल्यास पालकांना योग्य मदत, उपचार आणि मुलासाठी अनुकूल वातावरण मिळवता येतं.

ऑटिझम असलेल्या मुलांमध्ये मुख्यतः तीन क्षेत्रांमध्ये फरक दिसतात:

भाषा आणि संवाद

ऑटिझम असलेली काही मुले वेगळ्या पद्धतीने संवाद साधतात. त्यांचा संवाद सामान्य वेळापत्रकानुसार किंवा पद्धतीनं होईलच असं नाही. पण याचा अर्थ असा नाही की ते संवाद साधायचा प्रयत्न करत नाहीत.

  • बोलायला उशीर होणे: काही मुलं इतरांपेक्षा उशिरा बोलायला लागतात. उदाहरणार्थ, 18 महिन्यांपर्यंत ती फार कमी शब्द वापरतात किंवा काहीच बोलत नाहीत.
  •  हावभाव (इशारे) कमी वापरणे: ती “दाखवणं”, “हात हलवणं”, “हो/नाही म्हणणं” अशा हावभावांचा वापर कमी करतात. काही मुले बोलण्याऐवजी कृती, चेहर्यावरील भाव किंवा शरीराच्या हालचालीतून संवाद साधतात.
  •  एकोलालिया (Echolalia): काही मुले गाण्यांमधून, व्हिडीओंमधून किंवा मोठ्यांकडून ऐकलेल्या वाक्यांचा परत परत उच्चार करतात. याला एकोलालिया म्हणतात. हे त्यांच्यासाठी भाषा समजून घेण्याचा किंवा बोलण्याचा एक मार्ग असतो.
  •  डोळ्यात डोळे मिळवण्यात फरक: काही मुले इतरांकडे सरळ बघत नाहीत किंवा डोळ्यात डोळे मिळवत नाहीत. पण याचा अर्थ असा नाही की ते लक्ष देत नाहीत किंवा संवाद साधत नाहीत – डोळ्यात डोळे मिळवणं त्यांच्यासाठी आरामदायक किंवा गरजेचं वाटतच नसेल.

सामाजिक संवाद (Social Interaction)

ऑटिझम असलेल्या मुलांचा सामाजिक संवाद वेगळा असू शकतो. याचा अर्थ असा नाही की त्यांना लोकांमध्ये रस नाही, तर त्यांचा संवाद करण्याचा मार्ग इतरांना सहज कळत नाही.

  • एकटे खेळणे पसंत करणे: काही मुलांना एकटे खेळायला आवडतं किंवा गटामध्ये खेळण्यात कमी रस असतो. याचा अर्थ असा नाही की त्यांना लोकांची company नको आहे – कधी कधी त्यांना स्वतःचा वेळ लागतो किंवा गटामध्ये कसे सामील व्हावे हे समजत नाही.
  •  वेगळ्या पद्धतीनं जोडणं: काही मुले त्यांच्या नावाला लगेच प्रतिसाद देत नाहीत किंवा इतरांकडे लक्ष देताना “दिसत” नाहीत – जसं एखादी वस्तू दाखवताना बोटानं दाखवलेल्या गोष्टीकडे न पाहणं. पण याचा अर्थ असा नाही की ते लक्ष देत नाहीत – ते वेगळ्या पद्धतीनं प्रतिक्रिया देत असतात.
  • सामाजिक संकेत समजण्यात अडचण: चेहर्‍यावरील भाव, आवाजातील चढ-उतार, किंवा सामाजिक नियम समजायला कधी कधी कठीण जातं. ते अपेक्षित पद्धतीनं प्रतिसाद देत नसले, तरी त्यांना काळजी नसते असं म्हणता येत नाही.
  •  भावना व्यक्त करण्यात फरक: काही मुलं त्यांच्या भावना अशा प्रकारे दाखवत नाहीत की इतरांना त्या लगेच समजतील. त्यांना भावना ओळखायला, सांगायला किंवा समजून घ्यायला अधिक मदतीची गरज असू शकते.

संवेदनांचा अनुभव, हालचाली आणि आवडी (Sensory regulation, movement, and interests)

ऑटिझम असलेली बरीच मुलं आजूबाजूच्या जगाचा अनुभव खूप तीव्र संवेदना आणि हालचालीतून घेतात. इतरांना जी वागणूक “वेगळी” किंवा “सामान्य नसलेली” वाटते, ती त्यांच्यासाठी स्वतःला शांत ठेवण्याचा, आनंद व्यक्त करण्याचा किंवा लक्ष केंद्रित करण्याचा मार्ग असतो.

  •  स्टिमिंग (Stimming): काही मुलं हात हलवणं, झुलणं, फिरणं किंवा उड्या मारणं अशा हालचाली वारंवार करतात. याला स्टिम्स म्हणतात आणि त्यामुळं त्यांना शांत वाटतं, लक्ष केंद्रित होतो किंवा आनंदही मिळतो.
  • रोजच्या सवयींबद्दल खूप ठराविकता: रोजचं ठरलेलं वेळापत्रक किंवा रूटीन बदललं की त्यांना खूप त्रास होतो. नेमकेपणा त्यांना सुरक्षित वाटतो, त्यामुळे नवीन गोष्टी किंवा बदल झाल्यास थोडी अधिक तयारी किंवा आधार लागतो.
  • विशिष्ट गोष्टींबद्दल खोल आवड: काही मुलं एखाद्या विषयात किंवा वस्तूंत खूप रस घेतात – कधी कधी खूप वेळ त्याच गोष्टीत मग्न राहतात. ही त्यांची विशेष आवड त्यांच्यासाठी आनंद, शिकण्याचा आणि समाधान मिळवण्याचा मार्ग असतो.
  • संवेदनांची वेगळी अनुभूती: काही मुलं आवाज, प्रकाश, स्पर्श, गंध किंवा विशिष्ट वस्तूंच्या पोताबाबत खूप संवेदनशील असतात – किंवा त्या संवेदनांचा जास्त अनुभव घ्यायचा प्रयत्न करतात. उदाहरणार्थ, खूप आवाज असलेल्या ठिकाणी ते कान झाकतात किंवा विशिष्ट कापडांचा स्पर्श खूप आवडतो. ही प्रतिक्रिया अति नाही, तर त्यांच्या मेंदूला त्या संवेदना अशा प्रकारे जाणवतात.

लवकर आधार व उपचाराचे महत्त्व

लवकर ओळख आणि उपचार केल्यास मुलांच्या विकासात मोठा फरक पडतो. प्रत्येक मुलाच्या गरजेनुसार दिलेले उपचार आणि मदत प्रणाली त्यांना स्वतःची पूर्ण क्षमता गाठण्यास मदत करतात.

महत्त्वाचे उपचार प्रकार:

  • स्पीच आणि भाषा उपचार: मुलांच्या संवाद कौशल्यात सुधारणा करतो.
  • ऑक्युपेशनल थेरपी (व्यवसाय उपचार): दैनंदिन जीवनातील क्रिया व शरीराच्या हालचाली सुधारतो.
  • वर्तणूक उपचार (Behavioral Therapy):विशिष्ट वर्तनावर लक्ष केंद्रित करून सकारात्मक सवयी निर्माण करतो.
  • पालक प्रशिक्षण कार्यक्रम:पालकांना त्यांच्या मुलाच्या विकासाला मदत करण्यासाठी योग्य मार्गदर्शन व तंत्र शिकवतो.

भारतातील अडचणी आणि प्रयत्न

भारतात ऑटिझमची लवकर ओळख होण्यात अडचणी येतात कारण अजूनही जनजागृती आणि सुविधा कमी आहेत. तरीही, स्क्रीनिंग (चाचणी)समर्थन सेवा सुधारण्यासाठी काही उपक्रम सुरु झाले आहेत. जर तुमच्या मुलामध्ये वर नमूद केलेली लक्षणं दिसत असतील, तर कृपया बालरोगतज्ज्ञ (Pediatrician) किंवा विकास तज्ज्ञांशी (Developmental Specialist) संपर्क साधा. लवकरच केलेली तपासणी योग्य वेळेत उपचार सुरू करण्यास मदत करू शकते आणि मुलाच्या एकूण भल्यासाठी फायदेशीर ठरते. ऑनलाइन स्क्रीनिंग टूल्स उपलब्ध असले तरी, ती तज्ज्ञ तपासणीची जागा घेऊ शकत नाहीत.

साधने आणि मदत (Resources and Support)

ऑटिझमविषयी अधिक माहिती हवी असल्यास, आमच्या Autism Factsheet मध्ये ऑटिझम म्हणजे काय, कोणते उपचार उपलब्ध आहेत याची उपयुक्त माहिती दिली आहे. पालक, शिक्षक आणि समाज यांचा समज आणि आधार हे मुलाच्या विकासात खूप महत्त्वाचे असतात.

आभार

या मजकुराचे तेलगू भाषांतर केल्याबद्दल आम्ही आमचे स्वयंसेवक श्रीमती सैलजा ताडिमेती आणि श्री. कृष्णाजी देवलकर यांचे आभार मानतो.

कृपया लक्षात घ्या

जर तुम्हाला ऑटिझम, डाऊन सिंड्रोम, ADHD किंवा इतर विकासाशी संबंधित अडचणींबाबत प्रश्न असतील, तर Nayi Disha टीम तुमच्या मदतीसाठी सज्ज आहे. आमच्या मोफत हेल्पलाइनवर कॉल किंवा WhatsApp करा – 844-844-8996
आमचे समुपदेशक इंग्रजी, हिंदी, मल्याळम, गुजराती, मराठी, तेलगू आणि बंगाली भाषेत बोलतात.

सूचना (Disclaimer):

ही माहिती फक्त जनजागृतीसाठी आहे. तुमच्या मुलाच्या गरजेनुसार वैयक्तिक सल्ला घेण्यासाठी तज्ज्ञ डॉक्टरांशी संपर्क साधावा.

Tags:
Write Blog

Share your experiences with others like you!

English